Monday, April 28, 2008

सामासिक शब्दांची घटकपदं

मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीचे नवे नियम येऊ घातलेत. श्री. अरुण फडके ह्यांनी हे नियम कोणत्या प्रकारचे असतील हे लोकसत्तेत एक लेख लिहून सांगितलं आहे. त्याचं स्वरूप काय असेल हे त्या लेखात मांडलं आहे. शुद्ध लेखनात लोकांना येणारी मुख्य अडचण म्हणजे र्‍हस्वदीर्घाची. त्यात अलीकडच्या उच्चाराची ह्या नव्या नियमावलीने दखल घेतलेली आढळते.
पण काही गोष्टी मात्र लेखननियमांत स्पष्ट सांगितलेल्या नसतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात त्या वापरल्या जाणं फार उपयुक्त ठरतं. मराठीतल्या सामासिक शब्दांची घटकपदं कशी लिहावीत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जुन्या पद्धतीत ही घटकपदं जोडून लिहिली जात असत. उदा. पत्रकारपरिषद हे सामासिक पद घ्या त्याचा विग्रह पत्रकारांची परिषद असा होतो. आता ह्या दोन पदांचं पत्रकारपरिषद हे समस्त रूप लिहिताना एकतर दोन्ही पदं सलग लिहून पत्रकारपरिषद असं लिहायला हवं किंवा पत्रकार-परिषद असा पदच्छेद दाखवत तरी लिहायला पाहिजे. पत्रकार परिषद अशी वेगवेगळी पदं लिहू नयेत. जुने लेखक हा नियम नीट अनुसरत असं दिसतं. पण नंतर बहुधा इंग्रजीच्या अनुकरणाने सामासिक शब्दांची घटकपदं अशी सुटी लिहिली जाऊ लागली. प्रथम संस्थांच्या नावांत असं लिहिण्याचा प्रघात पडला. उदा. महाराष्ट्र साहित्य परिषद, भारत इतिहास संशोधन मंडळ. शुद्धलेखनविवेक ह्या आपल्या पुस्तकात द. न. गोखल्यांनी संस्थानामांचं लेखन हा सामासिक पदाची घटकपदं सलग लिहावीत ह्या नियमाचा अपवाद मानावा असं नोंदवल्याचं स्मरतं आहे. (मूळ पुस्तक आता हाताशी नाही. त्यामुळे स्मरणावरच विसंबणं भाग आहे.) आजकाल मात्र हा हा प्रकार केवळ संस्थानामांपुरता उरलेला नाही. पहावं तिथे ह्याच स्वरुपात लेखन होताना दिसतं आहे.
सामासिक शब्दांची घटकपदं सलग का लिहावीत? मराठी लेखनात आपण सामान्यतः (अपवाद आहेत पण मोजकेच आहेत) वाक्यातली पदं तोडून लिहितो. म्हणजे दोन सलग लिहिलेल्या खुणांमधली मोकळी जागा ही दोन वेगळी पदं आहेत हे दाखवते. मात्र पदाचे घटक आपण सलग लिहितो. त्यांत मध्ये जागा सोडत नाही. उदा. घोड्या आणि ला ह्यांनी मिळून घोड्याला हे पद साकारलं. आता आपण घोड्या ला असं त्याचं लेखन करत नाही (हिंदीत ते तसं करतात उदा. घोडे को). वाचताना आपण जेव्हा पदांतला संबंध पाहतो तेव्हा ही मोकळी जागा एक काम करत असते. घोड्याला ह्या पदात घोड्या ही प्रकृती आणि ला हा प्रत्यय ह्यांचा संयोग झाला आहे. समासात दोन प्रकृतिशब्दांचा संयोग होतो. उदा. पत्रकार आणि परिषद. हे शब्द सुटे स्वतंत्र शब्द म्हणून वावरू शकतात. समासात ते सलग लिहिले म्हणजे त्या पदांत समासाच्या स्वरूपाचा संबंध आहे हे कळतं. सुटं लिहिल्याने त्यांतला संबंध समासाच्या स्वरुपाचा आहे की अन्य कोणता हे ठरवावं लागतं.
उदा. शंकराचार्य मठातील विहिरीत पडल्याने बालिका जखमी असा बातमीचा मथळा एका वृत्तपत्रात मी वाचला. आणि शंकराचार्य पडल्याने बालिका कशी काय जखमी झाली असेल ह्याचा विचार करू लागलो. वस्तुतः बालिकाच पडली आणि तीच जखमी झाली. पण ती ज्या विहिरीत पडली ती शंकराचार्यांच्या मठातली विहीर होती. आता सामासिक पदाचे घटक वेगळे लिहिल्याने पडलं कोण ह्याविषयी घोटाळा झाला. शंकराचार्यमठाच्या असं लिहिलं असतं तर तो झालाच नसता. अनाथ विद्यार्थि गृह (हे उदाहरण कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांच्या शुद्ध लेखनावरच्या एका लेखातलं आहे.) ह्याचे दोन अन्वय शक्य आहेत. अनाथ विद्यार्थिगृह (म्हणजे विद्यार्थिगृह अनाथ आहे ) आणि अनाथ-विद्यार्थि-गृह (अनाथ विद्यार्थ्यांचे गृह). काय अभिप्रेत आहे हे कसं ओळखणार? कोणी म्हणेल की संदर्भाने कोण पडलं हे कळून येतंच की. हो. खरं आहे. संदर्भाने गोष्टी स्पष्ट होतात. पण संदर्भ उपलब्ध नसेल तर?
पुन्हा जी सोय लिपीत मुळात आहे ती केवळ आळसापोटी दवडण्यात काय अर्थ आहे? अनेकांना ही घटकपदं सलग लिहिली तर शब्दाची लांबी वाढेल अशी अडचण वाटते. आणि ती खरीही आहे. पण अशा वेळी आपण अनुषंगक (- ही खूण) घालून पदच्छेद दाखवून आकलन सोपं करू शकतो. मात्र ह्याही लेखनाला काहींचा आक्षेप आहे. असं लिहिणं डोळ्यांना खटकतं हा त्यांचा आक्षेप. ह्यातही तथ्य आहे हे आपण मान्य करू. पण हा मुद्दा फार महत्त्वाचा नाही. दिसण्यातलं नेटकेपण आणि अर्थग्रहण-अर्थांकनातली सोय ह्यांपैकी कशाला महत्त्व द्यायचं हे उघड आहे. हो वर दाखवला तसा अर्थग्रहणात घोटाळा होतच नाही असं कुणी सिद्ध केलं तर गोष्ट वेगळी.
सामासिक शब्दांची घटकपदं जोडून लिहिल्याने केवळ अर्थग्रहण सोईचं होतं असं नाही तर अर्थांकनातही ही सोय उपयोगी पडते. उदा. मराठी विश्वकोश (मराठी भाषेत असलेला विश्वकोश) आणि मराठी-विश्व-कोश (समजा मराठी लोकांच्या संस्कृतीविषयी, जीवनपद्धतीविषयी कुणी कोश रचला तर त्याला हे नाव मराठी विश्वासंबंधीचा कोश ह्या अर्थाने शोभून दिसेल.)
इंग्रजीत सामासिक शब्दांची घटकपदं कशी लिहावीत ह्याचा काही नेटका नियम नाही. त्यामुळे इंग्रजी लेखन वाचताना अनेकदा आधीचा अन्वय सोडून दुसरा अन्वय स्वीकारावा लागतो. संगणकीय प्रक्रियेत हे फारच त्रासाचं काम ठरतं. शेजारी लिहिलेले दोन शब्द एकमेकांशी संबंधित आहेत की नाहीत हे ध्यानात येत नाही. मराठीत ही प्रथा आधीपासूनच आहे. ती सोडण्यात आणि भोंगळपणाला रान मोकळं करून देण्यात काही अर्थ नाही. हा नियम सोडण्यामागे आळस हेच एक कारण आहे. हे कारण समजण्यासारखं असलं तरी समर्थनीय मुळीच नाही.
साहित्य-महामंडळानेही ह्या गोष्टीकडे लक्ष पुरवायला हवं. आणि आपल्या संस्थेच्या नावापासूनच सुधारणा करायला हवी.


मला आढळलेली काही वाक्यं. ह्यांत सामासिक पदांचे घटक तोडून लिहिल्याने अर्थग्रहणात अडचण येते.

ते पोलीस ठाण्याबाहेरच पत्ते खेळत होते. (कुणी दुसरे पोलिसठाण्याबाहेर पत्ते खेळत होते की स्वतः पोलीसच ठाण्याबाहेर पत्ते खेळत होते)
सीमा प्रश्नाचा पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री ( प्रश्नाचा पाठपुरावा सीमा करणार तर मग मुख्यमंत्री काय करणार?)