मराठी शब्दसंपदा
शासनव्यवहारात मराठीचा वापर व्हावा, तो वाढावा ह्या हेतूने महाराष्ट्रशासनाने १९६१ ह्या वर्षी एक समिती नेमून काही कोश तसंच अन्य काही मार्गदर्शक सामग्री सिद्ध केली. पण ह्या प्रयत्नांत एकीकडे इंग्रजीली पर्याय देण्याचा हेतू होता तर दुसरीकडे ह्या पर्यायी पारिभाषिक शब्दावल्या अन्य भारतीय भाषांशी विशेषतः हिंदीशी जुळवून घेण्याचाही हेतू - गौणत्वाने का होईना - अस्तित्वात होता. ह्या पारिभाषिक शब्दावल्या अनेक ठिकाणी नको तेवढ्या संस्कृताळल्या. परिणामी अनेकांनी ह्या शब्दावल्यांवर कृत्रिमपणाचा, बोजडपणाचा आरोप करून तिची हेटाळणी केली.
हे आरोप खरे होते. पण ह्या आरोपांमुळे शब्दावल्या सुधारल्या नाहीत. शासनानेही इंग्रजी शब्दांचा मराठी मुखवटा म्हणून वावरणाऱ्या ह्या शब्दावल्या सुधारण्याचा प्रयत्न पुन्हा केलेला आढळत नाही. शासकीय मराठीली शिव्या देण्याची टूमच पडली. आणि तीत आपण सर्वजण सहभागी झालो. पण ती सोपी करण्याचे प्रयत्न मात्र कुणी केले नाहीत.
असा प्रयत्न आपण करून पाहणार आहोत. ह्या प्रयत्नांत आपण सर्वांनी भाग घ्ययचा आहे. कारण मराठी ही आपली सर्वांची भाषा आहे.
आपण शासनव्यवहारकोशातले (शाव्यको) काही शब्द घेऊ. हा कोश इंग्रजी संज्ञांना मराठी पर्याय सुचवणारा कोश आहे. ह्या कोशात दिलेले जे पर्याय आपल्याला बोजड वा चुकीचे वाटतात ते निवडू. त्यांच्यातला दोष स्पष्ट करू. त्यांना नवा मराठी पर्याय देऊ. तो कसा योग्य आहे ह्यासंदर्भातला युक्तिवाद थोडक्यात मांडू.
इतकं झालं म्हणजे काम संपलं असं नव्हे. हे शब्द वापरून आपण व्यवहार करू लागलो तरच ह्या उपद्व्यापाला अर्थ आहे. आपली भाषा समृद्ध करणारे नवे नवे मराठी वळणाचे शब्द आपण वापरायला लागलं पाहिजे. उसनवारी आता पुरे झाली.
केवळ शाब्दिकच नव्हे तर बौद्धिक उसनवारीपासूनही एक दिवस आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपली भाषाही ज्ञान निर्माण करणारी भाषा म्हणून नावाजायला हवी.
इंग्रजी संज्ञा : ट्रॅक्टर
शाव्यकोतला पर्याय : कर्षित्र
हा शब्द फारच संस्कृतविशिष्ट आहे. सर्वसामान्यांना तो बोजडच वाटेल.
आपला पर्याय : नांगरगाडा
रणगाडा हा शब्द आपल्याला ठाऊक आहे. गाडा हा शब्द मोठा आकारही सुचवू शकतो. नांगरण्यासाठी वापरायचा गाडा तो नांगरगाडा. कर्षित्रच्या तुलनेत हा शब्द सोपा आणि मराठमोळा आहे.
Tuesday, October 23, 2007
मराठी शब्दसंपदा
लेखक :
सुशान्त
वेळ :
8:15 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
चांगला प्रयत्न आहे.
Post a Comment