Thursday, October 25, 2007

विस्मृतीत गेलेली क्रियापदे

१.मंगळणे
  • १. चकविणे, ठकविणे, भोंदणे, फसविणे.
  • २. चालविणे, गोड बोलून इष्ट हेतु साध्य करून घेणे, वश करणे.
२. मघमघणे -
  • घमघमणे, खमंग वास येणे, सुवास दरवळणे.
३. मटकणे-
  • मुरडणे
४. मठा(ठ)रणे/ मठाळणे- सक्रि.
  • १. नव्या भांड्याला ठोके मारणे, सफाई किंवा झिलई करणे
  • २. गोंजारणे, चुचकारणे
  • ३. मन वळविणे, अनुकूल करणे

मठारणे- अक्रि.

  • १.जखम बरी होत येणे
  • . सुस्त होणे, मंद होणे
  • . माजणे, गर्विष्ठ होणे

५. मडचणे-

  • घडी घालणे, दुमडणे

६. मडमडणे-अक्रि.

  • अंग मोडून येणे, कणकण वाटणे

७. मतणे-अक्रि.

  • एकमत होणे, विचार जुळणे

८. मथणे-अक्रि.

  • संगनमत करणे, एकत्र होणे

९. मथविणे-उक्रि.

  • वश करणे, वळविणे

१०. मरदणे, मरदळणे-सक्रि.

  • १. चोळणे, मर्दन करणे
  • २. चेपणे, रगडणे
  • ३. (ढगांनी) आच्छादित होणे, व्यापणे

मराठी शब्द

काळाच्या ओघात वापरातून गेलेल्या किंवा आपल्या व्यवहाराच्या कक्षेबाहेर असलेल्या अशा अनेक शब्दांशी आपली ओळख नसते. अनेकदा अमुक अमुक अर्थ व्यक्त करायला आपल्या भाषेत शब्द नाही असं आपण म्हणतो. खरं तर तो असतो. पण अनेक कारणांमुले आपल्याला त्याचा विसर पडलेला असतो.

कधी असे छान अर्थवाही शब्द कोशकारांनी नोंदवून ठेवलेले असतात. कधी साहित्यकारांनी ते चपखलपणे घडवलेले किंवा वापरलेले असतात. कधी लिखित नोंद नसली तरी विशिष्ट लोकसमूहात हे शब्द वापरात असतात.

म्हणूनच आपल्या भाषेतले असे शब्द हुडकून जिज्ञासूंना कळवावेत असं वाटलं। प्रत्येक दिवशी एक शब्द आणि त्याचा एक अर्थ इ-डाकेने लोकांना कळवावा असं मनात आहे. आपल्याला ह्या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल तर पुढील पत्त्यावर पत्र धाडून ती व्यक्त करावी म्हणजे आपल्यालाही दैनिक शब्द पाठवता येईल. आपल्या काही सूचना असतील तर त्याही अवश्य कळवाव्यात.
marathishabda(at)gmail.com



१५ ऑक्टोबर २००७
. शब्द : दुबदुबीत
. वर्ग : विशेषण
. लिंग :
. अर्थ :हाताने थापडले असता दुब्दुब् आवाज करणारा(कलिंगड, ढेरपोट ।)
. वापर: हा कलिंगड दुबदुबीत आहे.


१६ ऑक्टोबर २००७

आजचा शब्द
. शब्द : द्रम्म
. वर्ग : नाम
. लिंग :पु.
. अर्थ : १६ पणाचे एक नाणे , सुमारे सोळा पैसे ,पावली
. *वापर:
.कोषाचे नाव: महाराष्ट्र शब्दकोष
१७ ऑक्टोबर २००७
आजचा शब्द : सांजे
वर्ग : नाम
लिंग :.
अर्थ : दृष्ट काढण्यासाठी माणसावरून ओवाळून टाकण्याचे पदार्थ
बरोबर येणारी क्रियापदे : टाकणे, उतरणे
*वापर:
कोषाचे नाव: महाराष्ट्र शब्दकोष

१८ ऑक्टोबर २००७
आजचा शब्द: उकराई
वर्ग : नाम
लिंग :स्त्री.
अर्थ : खोदकाम करण्यास(उकरण्यास) लागलेला खर्च
वापर: विहीरीच्या उकराईचे पैसे वेगळे काढून ठेवले.
कोषाचे नाव: महाराष्ट्र शब्द

१९
ऑक्टोबर २००७
आजचा शब्द : थारावणे
वर्ग : क्रियापद
लिंग :
अर्थ : स्थिरावणे
*वापर:
कोषाचे नाव: महाराष्ट्र शब्दकोष

२२
ऑक्टोबर २००७
आजचा शब्द : थारेपालट
वर्ग : नाम
लिंग :पु.
अर्थ : राहण्याची जागा बदलणे
*वापर:
कोषाचे नाव: महाराष्ट्र शब्दकोष

२३
ऑक्टोबर २००७
आजचा शब्द : काबीजात,काबीजाद
वर्ग : नाम
लिंग :पु.
अर्थ : काबीज केलेला प्रांत, ताब्यातील प्रदेश
वापर:नवीन काबीजातील हिंदू लोकांचा न्यायनियम एका प्रकारच्या कायद्याने चालत होता।(महाराष्ट्र शब्दकोष)
कोषाचे नाव: महाराष्ट्र शब्दकोष

२४
ऑक्टोबर २००७
आजचा शब्द : आगट
वर्ग :नाम
लिंग :.
अर्थ : स्मशानात प्रेत नेताना त्यापुढे ज्यामधून विस्तव नेतात ते मडके.
*वापर
कोषाचे नाव: महाराष्ट्र शब्दकोष

२५
ऑक्टोबर २००७
आजचा शब्द : आंगतपंगत
वर्ग :नाम
लिंग :स्त्री
अर्थ : मुलांच्या एकत्र भोजनाचा एक प्रकार, प्रत्येकाने आपआपल्या घरचे अन्न आणून त्यातील काही देवघेव करून एकत्रभोजन करणे


Wednesday, October 24, 2007

मराठी शब्दसंपदा

मराठी शब्दसंपदा

इंग्रजी संज्ञा : बुलडोझर

शाव्यकोतला पर्याय : बलीवर्द यंत्र
मुळच्या इंग्रजी संज्ञेतल्या शब्दघटकांचं भाषान्तर. मुळात बलीवर्द हा शब्द सहज कळणारा नाही. इंग्रजी लोक जे रूपक वापरतात तेच आपण वापरायला हवं असं नाही.

आपला पर्याय : मोडगाडा
ह्या गाड्याच्या अनेक उपयोगांपैकी एका उपयोगाचा निर्देश ह्या संज्ञेने होतो. अनावश्यक रूपक टळतं.

Tuesday, October 23, 2007

मराठी शब्दसंपदा

मराठी शब्दसंपदा

शासनव्यवहारात मराठीचा वापर व्हावा, तो वाढावा ह्या हेतूने महाराष्ट्रशासनाने १९६१ ह्या वर्षी एक समिती नेमून काही कोश तसंच अन्य काही मार्गदर्शक सामग्री सिद्ध केली. पण ह्या प्रयत्नांत एकीकडे इंग्रजीली पर्याय देण्याचा हेतू होता तर दुसरीकडे ह्या पर्यायी पारिभाषिक शब्दावल्या अन्य भारतीय भाषांशी विशेषतः हिंदीशी जुळवून घेण्याचाही हेतू - गौणत्वाने का होईना - अस्तित्वात होता. ह्या पारिभाषिक शब्दावल्या अनेक ठिकाणी नको तेवढ्या संस्कृताळल्या. परिणामी अनेकांनी ह्या शब्दावल्यांवर कृत्रिमपणाचा, बोजडपणाचा आरोप करून तिची हेटाळणी केली.

हे आरोप खरे होते. पण ह्या आरोपांमुळे शब्दावल्या सुधारल्या नाहीत. शासनानेही इंग्रजी शब्दांचा मराठी मुखवटा म्हणून वावरणाऱ्या ह्या शब्दावल्या सुधारण्याचा प्रयत्न पुन्हा केलेला आढळत नाही. शासकीय मराठीली शिव्या देण्याची टूमच पडली. आणि तीत आपण सर्वजण सहभागी झालो. पण ती सोपी करण्याचे प्रयत्न मात्र कुणी केले नाहीत.

असा प्रयत्न आपण करून पाहणार आहोत. ह्या प्रयत्नांत आपण सर्वांनी भाग घ्ययचा आहे. कारण मराठी ही आपली सर्वांची भाषा आहे.

आपण शासनव्यवहारकोशातले (शाव्यको) काही शब्द घेऊ. हा कोश इंग्रजी संज्ञांना मराठी पर्याय सुचवणारा कोश आहे. ह्या कोशात दिलेले जे पर्याय आपल्याला बोजड वा चुकीचे वाटतात ते निवडू. त्यांच्यातला दोष स्पष्ट करू. त्यांना नवा मराठी पर्याय देऊ. तो कसा योग्य आहे ह्यासंदर्भातला युक्तिवाद थोडक्यात मांडू.

इतकं झालं म्हणजे काम संपलं असं नव्हे. हे शब्द वापरून आपण व्यवहार करू लागलो तरच ह्या उपद्व्यापाला अर्थ आहे. आपली भाषा समृद्ध करणारे नवे नवे मराठी वळणाचे शब्द आपण वापरायला लागलं पाहिजे. उसनवारी आता पुरे झाली.
केवळ शाब्दिकच नव्हे तर बौद्धिक उसनवारीपासूनही एक दिवस आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपली भाषाही ज्ञान निर्माण करणारी भाषा म्हणून नावाजायला हवी.

इंग्रजी संज्ञा : ट्रॅक्टर

शाव्यकोतला पर्याय : कर्षित्र
हा शब्द फारच संस्कृतविशिष्ट आहे. सर्वसामान्यांना तो बोजडच वाटेल.

आपला पर्याय : नांगरगाडा
रणगाडा हा शब्द आपल्याला ठाऊक आहे. गाडा हा शब्द मोठा आकारही सुचवू शकतो. नांगरण्यासाठी वापरायचा गाडा तो नांगरगाडा. कर्षित्रच्या तुलनेत हा शब्द सोपा आणि मराठमोळा आहे.